Mumbais Nature Trail | मुंबईतील मलबार हिल परिसरात उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग उन्नत मार्ग’ प्रकल्पाचे काम आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असले तरी या प्रकल्पाच्या उशिरामुळे पालिकेवर आर्थिक भार दुपटीने वाढला आहे. मूळ अंदाजानुसार हा प्रकल्प 12 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होणार होता. मात्र, कालावधी लांबल्यामुळे खर्च 25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याखेरीज देखभालीसाठीही पालिकेला 1.36 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
12 कोटींचा प्रकल्प 25 कोटींवर
मलबार हिलचा हा प्रकल्प ‘ट्री टॉप वॉक’ या सिंगापूरच्या संकल्पनेवर आधारित असून, मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच साकारण्यात आला आहे. कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशहा मेहता उद्यान यांच्या मधल्या उतारावर हा उन्नत मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून चालताना पर्यटकांना झाडांच्या शेंड्यावरून फेरफटका मारता येतो, तसेच निसर्गातील पशुपक्षांचे आवाज ऐकण्याचा अनुभवही घेता येतो.

या प्रकल्पाची मूळ किंमत 12.66 कोटी रुपये इतकी होती. मात्र, निविदाकाराने 40 टक्क्यांपर्यंत वाढीव दर लावल्यामुळे ती किंमत 22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा विलंब झाल्यामुळे अंतिम खर्च 25 कोटींपर्यंत गेला. कामासाठी लागणारे साहित्य अत्यंत दुर्गम जागेत पोहोचवावे लागल्यामुळे मजुरांची संख्या वाढवावी लागली. त्याचप्रमाणे बांधकामाचा भाग शांतता क्षेत्रात आल्यामुळे दिवसातील ठराविक वेळातच काम करता आले, हेही खर्चवाढीचे कारण ठरले.
खर्च वाढण्याचे कारण-
या प्रकल्पात 300 चौ. मी. सागवानी लाकूड वापरण्यात आले. ते लाकूड फॅक्टरीतून विशिष्ट डिझाइननुसार कापून आणावे लागले. यासाठी कुशल कामगारही जास्त खर्च करून उपलब्ध करावे लागले. कामाच्या दरम्यान माती ढासळू नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्या लागल्या, ज्यामुळे आणखी खर्च वाढला.
प्रकल्प आता सुरू झालेला असला तरी त्याच्या देखभालीसाठी पालिकेला आणखी 1.36 कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांचे कंत्राट द्यावे लागणार आहे. यामध्ये स्वच्छता, सुरक्षा आणि संचालन यांचा समावेश आहे.
हा प्रकल्प सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण प्रशासनाने नियोजन वेळेत पूर्ण केले असते, तर हा खर्च वाचवता आला असता, असा मतप्रवाह तयार होत आहे.