रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या लढाईनंतर आता नवनिर्वाचित खासदार नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.
खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला विनायक राऊत यांनी आव्हान देत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. राणे यांनी निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांनी पराभव करून विजय हासील केला.
या निवडणुकीत राणे यांनी प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैशांचे वाटप केल्याचा आरोप करून या गैरप्रकाराची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून राणे यांची निवड अवैध ठरवून मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती करत विनायक राऊत यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे, विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवळे यांनी याचिका दाखल केली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान नारायण राणे त्यांचे पुत्र नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केले. त्या विरोधात वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही. आचारसंहितेच्या भंगाकडे अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून डोळेझाक केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.