Maharashtra news : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली अटकेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी आहेत आणि त्यांचे डी-गँगशी संबंध आहेत, असं निरीक्षण आता कोर्टानेच नोंदविले आहे.
या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी म्हटले आहे की, ‘या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक सहभागी असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांवरून समोर आलं आहे’.
ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ईडीने १७ जणांचे जबाब साक्षिदार म्हणून नोंदविले आहेत.
त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. तर नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी बनवले आहे.