Maharashtra News : सध्या अनेक अजितदादांबरोबर असणारे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट करत येत्या दोन दिवसांत याचे सगळेच चित्र स्पष्ट होईल,
असे भाकीत माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांनी केले. नुकत्याच राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर खा. शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार देशमुख कराड येथे आले होते. त्यानंतर कराडच्या सर्किट हाऊस येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कमराबंद चर्चा करण्यासाठी ते थांबले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आ. अनिल देशमुख म्हणाले, मला ईडीने विनाकारण फसवून अडकवले. तसे न्यायालयाने आपले म्हणणेही मांडले होते. कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर ईडीने कारवाई केली. निव्वळ ऐकीव माहितीवर ही कारवाई करण्यात आली होती.
अनेक राज्यांत ईडीच्या कारवाईबाबत अशी स्थिती आहे, असेही ते म्हणाले. राज्यातल्या राजकीय घडामोडीबद्दल बोलताना ते म्हणाले. शरद पवार व महाविकास आघाडीचे सगळेच घटक एक होऊन भाजपच्या विरोधात रान उठवणार आहेत.
महाविकास आघाडीसमोर भाजपचा टिकाव लागणार नाही, असे स्पष्ट करत ते म्हणाले, अजितदादांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँगेस फुटली आहे. दादांबरोबर फुटलेले अनेक राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पवार साहेब व जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. येत्या दोन दिवसांत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीचे चित्र स्पष्ट होईल, असेही आ. देशमुख म्हणाले.