राहुरी :- सत्तेतून संधी मिळण्यासाठी विखे कुटुंबाने लाचारी कधीही पत्करली नाही, असे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. प्रभागनिहाय बैठकीत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची अनेकजण वाट पहात आहेत. मात्र, राजकीय पक्षांचे आज काही खरे राहिले नाही. काल शिवसेनेची उमेदवारी करणारे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.
राजकारणात संघर्ष अटळ असला, तरी मला लोकसभा विकासाच्या मुद्यावर लढवायची आहे. पक्षाचे चिन्ह ठरल्यानंतर सर्वांचे सातबारे वाचले जातील, असे विखे यांनी सांगितले.
राहुरीने विखे कुटुंबाला कायमच साथ दिली. बंद पडलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना मोठे समाधान आहे.
यंदाच्या गळीत हंगामात सव्वातीन लाख टन गाळप केले जाणार आहे, तसेच लवकरच उसाचे पेमेंट सभासदांच्या खात्यावर अदा केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.