श्रीगोंदे :- घनश्याम शेलार शिवसेनेत आले , ते केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी. शिवसेना-भाजपची युती झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी सेना सोडली. ते गेल्याने तालुक्यातील शिवसेना संपली, असे शेलारांनी समजू नये.
असे मुंगूसगावचे सरपंच आणि आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाप्रमुख रामदास कानगुडे यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्याबरोबर तालुक्यातून अनेक कार्येकर्ते गेल्याचे शेलार भासवत आहेत. त्यांनी नेमके कोणकोण गेले, त्यांची यादी जाहीर करावी, असे आव्हान कानगुडे यांनी या पत्रकात दिले आहे.
शेलार सेनेत येण्यापूर्वी श्रीगोंदे येथे शिवसेना होतीच आणि ते गेल्यावरही शिवसेना राहील, कारण शिवसेना हा एक विचार आहे. तो कोणी गेल्याने संपणार नाही. शेलारांकडून निष्ठावंतांवर मोठा अन्यायच झाला होता. ते गेल्याने आता कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी आली आहे.
आपला स्वार्थ साध्य झाला नाही, म्हणून शेलार पक्षप्रमुखांवर युती केल्याचे खापर फोडून बाहेर पडले, असेही या पत्रकात म्हटले आहे. शिवसैनिक नामोहरम झाल्याची शेलार यांनी केलेली टीका योग्य नाही.
कोणावर टीका करायची, याचे भान शेलार यांना नाही. शेलार यांच्याबरोबर फक्त चार कार्येकर्ते गेले म्हणून सेना संपली असा गवगवा करू नका, असा इशारा सरपंच कांनगुडे यानी दिला आहे.