अहमदनगर :- गारव्यामुळे दिवसा उबदार कपडे आणि रात्री खिडक्या, गॅलरीची दारे बंद करून झोपणाऱ्या घरांमध्ये आता बऱ्याच दिवसांनंतर पंखे सुरू झाले आहेत. नगरमध्ये गेल्या आठवडाभरात तापमानाचा पारा वर चढल्याने नगरकरांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे.
रात्रीचाही गारवा गायब झाला असून, सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. . शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. पुढील आणखी दोन दिवस तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वातावरणातील बदलांमुळे गेल्या आठ दिवसांत थंडी गायब झाली असून, कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. तापमान वाढल्याने दिवसा फिरताना उन्हाचा चटका जाणवतो आहे. छत्तीसगड ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.
त्यामुळे विदर्भात पावसाला पोषक हवामान असून, सोमवारी विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नगर शहरात शनिवारी व रविवारी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.