अहमदनगर :- तालुक्यातील वाकोडी येथे मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून तलवार, कटावणी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने विजय पवार या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, याप्रकरणी सोनू नारायण पवार (वय २४, रा. वाकोडी ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लखन सुंदर कांबळे, दिनेश नाथा सूर्यवंशी, कुंदन सुंदर कांबळे, जिगर सुंदर कांबळे (सर्व रा.वाकोडी) यांनी आपल्याशी झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरुन विजय नारायण पवार व अविनाश नारायण पवार (दोघे रा. वाकोडी) यांना शुक्रवारी (दि.२२)रात्री ९.३० वा. तलवार, कटावणी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जबर जखमी केले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विजय पवार या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सोनू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लखन कांबळे व दिनेश सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.