अहमदनगर :- जनतेला तात्काळ पोलिस सेवा देण्यासाठी नियंत्रण कक्ष डिजिटल करुन डायल 100 ही सेवा अत्याधुनिक पध्दतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
या यंत्रणेला मोबाईल App जोडण्यात आले असून या सेवेचे उदघाटन आज जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस उप अधीक्षक सागर पाटील आदि उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हयात 100 नंबरवर कॉल केल्यानंतर प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत होता. त्याचा फायदा गुन्हेगारांना होत होता. तसेच गरजुंना मदत मिळण्यास विलंब होत होता.
जनतेला तत्काळ मदत मिळावी व तक्रारीचे निवारण व्हावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून डिजिटल कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला या कार्यप्रणालीमुळे जिल्हयातील नागरिकांना पोलिस नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क साधता येणार आहे.
डायल 100 वर संपर्क केल्यानंतर पोलिसाना गुन्हयाचे ठिकाण समजणार आहे. व त्यामुळे तत्काळ मदत करणे शक्य होणार आहे. नियंत्रण कक्षात काम करणा-या महिला पोलिस कर्मचारी व जिल्हयातील सर्व पोलिस निरीक्षक यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
30 डिजिटल लाईन्स कार्यान्वित केल्याने जिल्हयातील कोणत्याही भागातून 100 नंबरला कॉल केल्यास एक मिनिटाच्या आत पोलिस नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे संपर्क साधता येईल. 100 नंबरवर कॉल आल्यानंतर शहरी भागातील पोलिस गुन्हयाच्या ठिकाणी , 6 मिनिटाच्या आत पोहचणार आहेत.
संबंधित पोलिस स्टेशनच्या निरीक्षक यांना एक मिनिटांच्या आत माहिती मिळणार आहे. अश्लिल कॉल, मिसकॉल, फेककॉल याची माहिती तात्काळ मिळणार आहे. त्यामुळे गरजु व्यक्तींना तत्काळ मदत मिळणार आहे.