संगमनेर :- शेताच्या कडेला खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने झडप घालत शेतात नेत ठार केल्याची घटना रविवारी रात्री संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात घडली. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने घटनास्थळाजवळ पिंजरा लावला आहे.
प्राजक्ता तेजस मधे असे या चिमुकलीचे नाव आहे. अकलापूर येथील भोरमळ्यात चिमुकलीचे आई-वडील सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील टोमॅटोवर फवारणी करत होते. तर त्यांच्या तीन मुली शेताच्या कडेला खेळण्यात रंगून गेल्या होत्या. याचदरम्यान शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने खेळणाऱ्या प्राजक्तावर हल्ला चढवत तिला तोंडात पकडत उसाच्या शेतात आसरा घेतला.
चिमुकलीवर हल्ला करत बिबट्याने तिला शेतात नेल्याने दोन्ही मुलींनी ओरडा केल्याने आई-वडील धावत आले. त्यांना झालेला प्रकार समजल्याने त्यांनीही आरडाओरडा केल्याने लोकांचा तेथे मोठा जमाव जमला. जमावाने फटाके फोडत बिबट्याला पळवून लावण्याचे प्रयत्न केले.
दबा धरून बसलेल्या बिबट्यापासून काही अंतरावरच प्राजक्ता जखमी अवस्थेत आढळली. तिच्या कानाजवळ गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. तसेच मान पकडल्याने ती मोठ्या प्रमाणात जखमी झाली होती. तिला आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.