अहमदनगर :- जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १२८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
यामध्ये २८ कोटींचा निधी जामखेड तालुक्यासाठी दिला असुन, अनेक वर्षांपासुन रखडलेल्या खर्डा येथील अमृतलींग जोड तलावासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खर्डा येथे आज केले.

खर्डा (ता. जामखेड) येथील विविध विकास कामांच्या भुमिपूजनाप्रसंगी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.
यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे ,खासदार दिलीप गांधी, आमदार सुरेश धस, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री सुर्यकांत मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे, सोमनाथ पाचारणे, मनीषा सुरवसे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, उपाध्यक्ष शाकीर खान, खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच संजय गोपाळघरे, उपसरपंच संजय सुर्वे आदी उपस्थित होते.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, खर्डा गावासाठी सुमारे १२ कोटी, ७८ लाख , १० हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगर -बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी घरकुल, मोफत गॅस व शेतकर्यांसाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली आहे.
गोरगरिबांच्या सेवेच्या माध्यमातून मोदींनी श्रावणबाळ होण्याचे काम केले. अमृतलींग प्रकल्पामुळे खर्डा गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच तालुक्यात लवकरच जनावरांसाठी छावण्या सुरू करण्यात येतील. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.