जामखेड :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाने सध्या तळ गाठला असून तलाव कोरडा पडल्याने तलावातून पाण्याच्या मुख्य टाकीत पाणी येणे बंद झाले आहे.
त्यामुळे सध्या मोटारी लावून पाणी चारीत सोडले जाते व चारीतून टाकीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या शहराला पंधरा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाची साठवण क्षमता ११९ दशलक्ष घनफूट असून तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली असल्याने तलावात मृत पाणीसाठा शिल्लक राहीला आहे.
ही योजना जुनी असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या पाणीपुरवठा योजनेवर ताण पडत आहे. सध्या तलावाच्या मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत असून हेही पाणी मार्च महिन्यापर्यंत पुरेल इतकेच आहे.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. या पूर्वी शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत होता,
मात्र, पाणीपातळी खालावल्याने तलावातील पाणी दोन मोटारी लावून चारीत सोडले जात आहे व नंतर ते पाण्याच्या टाकीत सोडले जात आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.