कर्जत तालुक्यातील माथेरान शहरातील विविध प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात १६ ते १९ मार्च २०२५ दरम्यान सलग सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, माथेरान कोणत्याही परिस्थितीत मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि मोटारमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते, आणि ही ओळख कायम ठेवण्यासाठी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, सध्या माथेरानमध्ये सुरू असलेल्या २० ई-रिक्षांची संख्या तूर्तास वाढवली जाणार नाही आणि या रिक्षांसाठी राज्य सरकारने फेरनिविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देशही देण्यात आले.

माथेरानच्या रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या मुद्द्यावरही सुनावणी झाली. याबाबत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) कडून अहवाल मागवण्यात आला आहे.
मुंबई आयआयटीकडून यापूर्वी अहवाल सादर झाला असला, तरी मातीची धूप रोखण्यासाठी पेव्हर ब्लॉक आवश्यक आहेत का, ते बसवल्याने धूप थांबेल का, काँक्रीट पेव्हर ब्लॉकऐवजी मातीचे पेव्हर ब्लॉक वापरता येतील का,
आणि धूप रोखण्यासाठी दुसरा पर्याय आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निरीला तपासाचे आदेश देण्यात आले. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ए. जी. मसिह यांच्या खंडपीठाने निरी ही पर्यावरण विज्ञानातील अग्रगण्य संस्था असल्याचे नमूद करत, या संस्थेकडून तपासणी आणि अहवालाची अपेक्षा व्यक्त केली.
सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी घोडेस्वार आणि घोडावाला संघटनांच्या वतीने युक्तिवाद केला. त्यांनी मांडले की, पेव्हर ब्लॉक टाकणे हा मुख्य मुद्दा नसून, माथेरानमध्ये मोटार वाहनांचा प्रवेश हा खरा चिंतेचा विषय आहे.
यावर न्यायमूर्ती गवई यांनी आश्वासन दिले की, माथेरानचे मोटारीकरण होणार नाही आणि याची काळजी घेतली जाईल. तसेच, पावसाळ्यात पेव्हर ब्लॉक निसरडे होऊन लोक आणि घोड्यांसाठी धोकादायक ठरू शकतात,
या मुद्द्याचाही विचार करण्यात आला. निरीच्या तज्ज्ञांनी या सर्व बाबींचे परीक्षण करून अहवाल सादर करावा, यासाठी महाराष्ट्र सरकारला आवश्यक व्यवस्था आणि सहाय्य पुरवण्याचे निर्देश देण्यात आले.
ई-रिक्षांच्या संख्येबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माथेरानला मोटार वाहतुकीचे शहर बनवले जाणार नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले. माणसांनी ओढल्या जाणाऱ्या हातरिक्षा या मानवी हक्कांचे उल्लंघन करतात,
म्हणून प्रायोगिक तत्त्वावर २० ई-रिक्षांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही संख्या वाढवली जाणार नाही, असा स्पष्ट आदेश देण्यात आला. त्याचबरोबर, या २० ई-रिक्षांच्या परवानगीमुळे हातरिक्षा ओढणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची बाब लक्षात घेऊन,
राज्य सरकारने फेरनिविदा प्रक्रिया काढण्याचा पुनर्विचार करावा, असेही न्यायालयाने सुचवले. या निर्णयामुळे माथेरानच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेसह स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण होईल, अशी अपेक्षा आहे.