Uddhav Thackeray : दहा वर्षांत नुसते थापांचे इंजिन सुरू आहे. या इंजिनाला कितीही डबे लावा, गाडी पुढे जाणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी मंगळवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी ते बोलत होते. भाजप बुरसटलेल्या मानसिकतेचा पक्ष असून मला नकली शिवसेना म्हणणारे भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली नेते आहेत, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर आसूड ओढले.
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा भाजपला अधिकार नाही. दहा वर्षांत त्यांनी महाराष्ट्रात कोणाकोणाच्या पाठीत वार केला, हे सर्वांनी पाहिला आहे.
मोदी आणि शाह देशभर, महाराष्ट्रभर मतांची भीक मागत फिरत आहेत; पण ज्यांच्याकडे भीक मागता त्यांचा कधी विचार केला आहे का? असा सवाल करत ठाकरे यांनी भाजप सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले,
मात्र तरुण आजही वणवण फिरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपाने देशात कंत्राटी पद्धती आणली आहे. देशात कोणाला कायमस्वरूपी रोजगार नाही. कंत्राटी पद्धतीने अग्निवीर आणि कामगार पद्धती आणली आहे. त्यामुळे तुमचे कंत्राट येत्या निवडणुकीत रद्द करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.