MSRTC News : वर्षभरात एकही नवी एसटी बस महाराष्ट्रात येणार नाही !

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News : शहरापासून खेडोपाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बससाठी हिरवा झेंडा दाखवत पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली.

यानंतर डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी काही बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येत असताना इलेक्ट्रिक बसेस आणि नव्या आणि भाडे तत्त्वावर अशा मिळून १३५० बसेस वर्षअखेरीस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या.

मात्र तूर्तास या प्रकल्पाला ब्रेक लागला असल्याचे एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या.

गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र आयुर्मान संपुष्टात आलेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे.

डिसेंबरपर्यंत एसटी महामंडळाच्या नव्या १३५० एसटी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे अलीकडेच एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र पुण्यातील दापोडी येथे बसेसची बांधणी अल्पप्रमाणात सुरू असून

खासगी कंपन्यांनी एसटी बसेसच्या निर्मितीला नकार दिल्याने पुढील वर्षभरात एकही नवी एसटी बस ताफ्यात दाखल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे वर्षभरात नव्या एसटी बसेस दाखल होण्याची वाट खडतर असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe