आता मुंबईत आयआयसीटी – फडणवीस ; गोरेगावमधील फिल्म सिटीत जागा, केंद्र सरकार देणार ४०० कोटी

Published on -

१५ मार्च २०२५ मुंबई : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयआयसीटी ही संस्था नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल आणि संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड व नवीन दिशा देणारे केंद्र ठरेल, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदे (वेव्हज २०२५) च्या पहिल्या सत्राचे आयोजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासनदरम्यान ‘वेव्हज २०२५’ निमित्त सामंजस्य करार झाला.

जागतिक स्तरावर होणाऱ्या या पहिल्या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही त्यांनी आभार मानले. यासंदर्भात फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) ची स्थापना केली जाईल.

या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून याबाबत केंद्र शासन ४०० कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यता देणार आहे. आयआयसीटी संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, अॅनिमेशन,ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.

मुंबईतील आयआयटी मुंबई प्रमाणेच ही संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातील सर्वोत्तम केंद्र बनेल. मात्र या नव्या संस्थेमुळे भारताच्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे.जसे दावोस आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे,तसेच हे व्यासपीठ क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड उभारणारे ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईत ‘वेव्हज २०२५’ परिषद

१ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘वेव्हज २०२५’ ही भव्य परिषद होणार आहे. या परिषदेसाठी १०० देश सहभागी होतील. या परिषदेमुळे नवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण, धोरणे आणि गुंतवणुकीबाबत चर्चा होईल. ही परिषद ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, अॅनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल. यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळेल.

मुंबई जागतिक मनोरंजनाचे केंद्र

मुंबई ही जशी भारताची आर्थिक राजधानी आहे तशीच ती मनोरंजन क्षेत्राची सुद्धा राजधानी आहे. महाराष्ट्र हा भारतीय सर्जनशील अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, चित्रपट, टेलिव्हिजन, डिजिटल कंटेंट, अॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. मुंबईत दादासाहेब फाळके चित्रनगरी, फिल्मिस्तान स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ आणि फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यासारखी प्रतिष्ठित संस्थाने आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘वेव्हज २०२५’ परिषदेचे आयोजन मुंबईत केले आहे.

या निमित्ताने मीडिया, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रांना चालना मिळेल. सध्या जागतिक पातळीवरील माध्यम आणि मनोरंजन उद्योग झपाट्याने प्रगती करत असून, या क्षेत्राची बाजारपेठ वर्ष २०२४ पर्यंत २.९६ ट्रिलियन डॉलर्स होती.

भारतात २०२९ पर्यंत ५० बिलियन डॉलर्स पर्यंत या क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे. भारत सध्या ६० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मसह जागतिक स्तरावर वेगाने विस्तार करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe