२ जानेवारी २०२५ मुंबई: शिवसेना पक्षात फूट पाडून मूळ शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला सुरंग काही थांबता थांबत नसून रोज नवनवी नावे समोर येत आहेत.
विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले.त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’तून सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू असताना शिवसेनेचे (ठाकरे) सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर ‘एक्स’द्वारे स्तुतिसुमने उधळली आहेत.
शिवसेना (ठाकरे) आणि फडणवीस यांच्यातील वैर कायम असताना नार्वेकर मात्र वारंवार फडणवीस आणि शुक्ला यांच्या कौतुकाच्या पोस्ट करत असल्याने ते पक्षविरोधी भूमिका घेत आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात शरण आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेनेने (ठाकरे) सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सीआयडीसारख्या यंत्रणेला कराडचा शोध का घेता आला नाही, अशी शंका घेतली गेली. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झाले असताना नार्वेकर यांनी मात्र फडणवीस आणि शुक्ला यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.
नार्वेकरांची ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून सोशल मीडियात त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठते आहे.शुक्ला यांच्यावर शिवसेनेसह (ठाकरे) विरोधकांचे फोन टॅपिंग केल्याचे आरोप आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करून निवडणूक काळात शुक्ला यांचा पदभार काढून घेण्यास आयोगाला भाग पाडले होते.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २८ नोव्हेंबरला २०२४ त्यांच्याकडे पुन्हा महासंचालकपदाचा भार दिला गेला, तेव्हा महाविकास आघाडीने त्यावर आक्षेप घेतला होता. तर, फक्त नार्वेकर यांनी शुक्ला यांचे अभिनंदन केले होते.
शिवसेना फुटीसंदर्भात विपरीत निकाल दिलेल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसैनिकांनी आगपाखड केली. मिलिंद नार्वेकर यांनी मात्र राहुल नार्वेकर यांना पुन्हा अध्यक्षपद मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला झाला. फडणवीस यांनी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
शिवसेनेने (ठाकरे) या शपथविधीबद्दल आस्था दाखवली नव्हती. मात्र, त्यावेळीही नार्वेकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. बाबरी मस्जिद पाडल्याच्या समर्थनार्थ ६ डिसेंबरला नार्वेकर यांनी पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. महाविकास आघाडीत त्यामुळे वाद रंगला. समाजवादी पार्टीने आघाडीबाहेर जाण्याची भूमिका घेतली. नार्वेकर यांच्या सतत महायुती सरकारला सोयीच्या पोस्ट येत असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियात ‘छुपा बंडखोर’ असल्याची टीका होऊ लागली आहे.