छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मागील पावणेदोन वर्षांपासून उपोषण करून, हातापाया पडून, कायदेशीर मार्गाने मागण्या करून पाहिले, मात्र हाती काही मिळाले नाही. त्यामुळे आता उपोषणे बंद करणार असून थेट समोरासमोरची लढाई लढणार आहे. लवकरच मुंबईत धडकणार, मुंबई बंद पडली तरी, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आता आमची शक्ती आम्ही सरकारला दाखवू, असा निर्धार मनोज जरांगे यांनी बुधवारी व्यक्त केला.
रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले की, राज्यभरातील प्रत्येक गावातील गल्लीतील गोरगरीब मराठ्यांना कनेक्ट करायचे आहे.
मराठ्यांनो, आता तरी डोळे उघडा…
स्वतःचे लेकरू आधी बघायचे, मग बाकीचे बघायचे, हे फडणवीसांकडून शिकले पाहिजे. पक्ष पक्ष करता नुसते. माझा पक्ष, माझा नेता म्हणता, महाराष्ट्रातील मराठ्यांनी आता तरी डोळे उघडावे, सावध व्हा, इथून पुढे आता तरी एकजूट राहा, अशा शब्दांत जरांगे यांनी विविध राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्या मराठ्यांच्या डोळ्यात अंजन घातले.
स्वतःच्या मुलींमध्ये आमची लेकरं बघा
देवेंद्र फडणवीस यांना मायबापाची माया काल पहिल्यांदा दिसून आली. मुलीच्या परीक्षेमुळे ते सागर बंगल्यावरून अवघ्या ५०० मीटरवरील वर्षा बंगल्यावर जात नाहीत. मुलीच्या शब्दाखातर परीक्षा झाल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. यावरून त्यांना बापाचे काळीज आहे, हे दिसून आले. लेकीच्या शब्दापुढे तुम्ही जाऊ शकत नाही, माझ्या गोरगरीब
मराठ्याच्या पोरांसाठी माया का नाही. तुमच्या मुलीमध्ये आमची लेकर का पाहत नाही? गोड गोड बोलून धनगर, मराठा समाजाचे वाटोळे केले. तुमची नियत चांगली नाही, महाराष्ट्रातील सर्व मुले ही तुम्हाला लेकीप्रमाणे का वाटत नाहीत? तुमच्या आणि आमच्या पोरांमध्ये भेदभाव का करता? असे प्रश्न जरांगे यांनी फडणवीस यांना उद्देशून केले.