बांगलादेशात अराजक माजल्यानंतर भारताने या देशाला लागून असलेल्या सीमा सील केल्यात. परिणामी बांगलादेशातून भारतात होणारी कृषी निर्यात ठप्प झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यात करणारे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावर याचा काही परिणाम होईल का?भाव उतरतील का? असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातून दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगला देशाकडे रवाना होतात, परंतू नाशिकहून बांगला देशात जाणारे कांदा ट्रकदेखील भारत- बांगलादेशाच्या सीमेवर थांबविल्याने याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकयांना बसणार आहे.
यामुळे कांद्याची सर्वाधिक होणारी निर्यात थांबल्याने दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळण- वळण व्यवस्था ठप्प झाली आहे. परिणामी कांद्याची वाहतूक होत नाही, असे पत्रात शेट्टी यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातील बिकट परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे केंद्राने याप्रश्नी हस्तक्षेप करुन बांगलादेशाच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कांदा विकण्याची ओढवणार नामुष्की !
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली, भारत-बांगलादेश सीमेवर कांदा निर्यात करणाऱ्या ट्रक्स अडवल्यामुळे या दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
यामुळे आता कोलकात्यात कमी किमतीत कांदा विकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.