Pune News : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे या चार रेल्वे स्टेशनचा ‘अमृत भारत रेल्वे स्टेशन’ योजनेत समावेश झाला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनचा विस्तार, सुशोभीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव दाभाडे या स्टेशनचा समावेश असून या कामाचे रविवारी (दि. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून भूमिपूजन होणार आहे.
रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ‘अमृत भारत स्टेशन’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी ४० कोटी ३५ लाख, तर आकुर्डी रेल्वे स्थानकासाठी ३३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
यामध्ये रेल्वे स्थानकावर फुटओव्हर ब्रीज, प्रतीक्षा रुम, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी- सुविधा, पर्यावरणपूरक वातारण, आवश्यकतेनुसार लिफ्ट, मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचना प्रणाली, वाहनतळासाठी जागा, शेड उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
श्रेयासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे लोकसभा मतदारसंघातील या रेल्वे स्टेशनचा कायापालट होत असल्याचा दावा केला. तर, पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचा हा विकास होत असल्याचा दावा आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष शंकर जगताप, पदाधिकारी सदाशिव खाडे, अमित गोरखे, नामदेव ढाके, अनुप मोरे, राजू दुर्गे यांनी केला. रेल्वेच्या कामावरून भाजप- शिवसेनेत श्रेयासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे यावरून पाहायला मिळाले.