आजपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी झाली सुरू, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर!

पुणे म्हाडाच्या १५% व २०% योजनांत शिल्लक राहिलेल्या सदनिका 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर वाटप होणार आहेत. आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून पात्र अर्जदारांनी म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन आहे.

Published on -

पुणे- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे वितरण आता “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र व्यक्तींना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून सुरू होत असून, पुणे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शिल्लक सदनिका गरजूंना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हाडा करत आहे.

नोंदणी प्रकिया

या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हा आहे. पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर (https://bookmyhome.mhada.gov.in) नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून, विकासकांकडून शिल्लक सदनिकांचा अहवाल प्राप्त होताच त्या सदनिकांचे वितरण सुरू होईल.

ही प्रक्रिया निरंतर चालणार असून, जोपर्यंत सर्व शिल्लक सदनिका वितरित होत नाहीत, तोपर्यंत ती सुरू राहील. पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि सभापती (राज्यमंत्री दर्जा) शिवाजी आढळराव पाटील यांनी सर्व गरजू आणि पात्र अर्जदारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

 

अर्ज कसा करायचा

नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ ठेवण्यासाठी पुणे म्हाडाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे. अर्जदारांना त्यांची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. या योजनेत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचे तत्त्व असल्याने, ज्या अर्जदारांना लवकर घर हवे आहे त्यांनी तातडीने अर्ज करणे गरजेचे आहे.

विकासकांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार, या सदनिकांचे वितरण टप्प्याटप्प्याने होईल, ज्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना संधी मिळेल, असा विश्वास म्हाडा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News