Maharashtra News : मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर नव्याने मार्गिका टाकण्याचे काम जोमाने केले जात आहे. या मार्गावर कर्जत-वावर्ले यादरम्यान होणारा बोगदा हा या मार्गावरील सर्वात मोठा बोगदा असल्याचे मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्या कडून सांगण्यात येत आहे. या मार्गावरील दोन्ही बोगद्यांची कामे वेगाने सुरू आहेत.
१०९ कोटी रुपये खर्चून मध्य रेल्वेने पनवेल- कर्जत रेल्वेमार्ग तयार करत आहे. २००६ मध्ये या मार्गावर प्रथम मालवाहू वाहतूक सुरू करण्यात आली, आणि त्यानंतर पहिल्यांदा २००७ मध्ये नाशिक-पनवेल-पुणे ही एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली. एकेरी मार्ग असतानादेखील मागील काही वर्षांत लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या या मार्गावर चालवल्या जात आहेत.
परंतु स्थानिक प्रवाशांसाठी शटल सेवा चालवली जात नाही. याबाबत मागणी केल्यानंतर दुहेरी मार्ग नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाने दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी २०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
कर्जत-पनवेल मार्गावर दुहेरी मार्गिका टाकण्यासाठी नवीन मार्ग आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्गाचे काम वेगाने सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई लोकलच्या पायाभूत सुविधेत महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या उभारणीस सुरुवात झाली आहे. सध्या मध्य रेल्वेवरील वापरात असलेल्या पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीने लांब आहे. मुंबईहून पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा पर्याय या नव्या रेल्वेमार्गामुळे उपलब्ध होणार आहे. या नवीन मार्गामुळे कल्याणमार्गे कर्जतला जाण्याच्या तुलनेत या मार्गावरून वेळेची बचत होणार आहे.
एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल- कर्जत लोकल आकारास येत आहे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले हा बोगदा २८०० मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. वावले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे.
या बोगद्यांचे एकाच वेळी दोन्ही बाजूंनी कामे सुरू असून, साधारण दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. कर्जत दिशेला २८०० मीटर लांबीचा बोगदा किरवली गावाजवळ निघत आहे. तर ३०० मीटर लांबीचा नवीन बोगदा हा किरवली गावापासून निघतो आणि आयटीआयपासून काही अंतरावर निघतो. या बोगद्याव्यतिरिक्त या मार्गावर राज्यमार्ग रस्त्यावर एक आणि मध्य रेल्वेच्या मुंबई- पुणे मेनलाइनवरील असे दोन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. कर्जतजवळील उड्डाणपूल १, २२५ मीटर आणि पनवेललगतचा पूल १,३७५ मीटरचा आहे. मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.