लाडक्या बहिणीसह इतर योजना सुरूच राहतील : एकनाथ शिंदे

Sushant Kulkarni
Published:

७ फेब्रुवारी २०२५ नांदेड : लोकसभेत ठाकरे गटापेक्षा आमच्या शिवसेनेला २ लाख, तर विधानसभेत १५ लाख जास्त मते मिळाली. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी निवडणुकीत दाखवून दिले आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना तसेच इतर जनकल्याणकारी योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.

नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने नवा मोंढा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या आभार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राज्याचे
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, विधान परिषदेतील गटनेते आ. हेमंत पाटील, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. बाबूराव कदम कोहळीकर, आ. आनंद तिडके बोंढारकर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि येथे सत्याचाच विजय झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९ जागा महायुतीच्या जिंकून
आल्या.हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. याच मैदानावर लाडक्या बहिणींचा मेळावा घेतला होता. तुमच्या १५०० रुपयांच्या ओवाळणीमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवला नाही तर बहिणींनी जोरात वाजवला पण, असे शिंदे म्हणाले.

बहिणींनी एकच मारला पण सॉलिड मारला, सावत्र भाऊ दृष्ट भाऊ यांना चारीमुंड्या चित केले. नांदेडकर जनतेने महायुतीला पैकीच्या पैकी मार्क, १०० टक्के रिझल्ट आणि १०० टक्के स्ट्राईक रेट राखला, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. बाळासाहेब सांगायचे की, खऱ्याला खरे म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा. निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी इथे आवर्जून आलो,असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.या वेळी ठाकरे गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

चार आमदार नांदेडच्या विकासाचा चौकार मारतील

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. यामुळे राज्यातीलच नाही तर देशातील विश्लेषकांनी तोंडात बोट घातली. शिवसेनेचे ४ आमदार नांदेडच्या विकासाचा चौकार मारतील, नांदेडचा चेहरामोहरा बदलतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हळद संशोधन केंद्राचे काम लवकरच सुरू होणार आहे. एमआयडीसीचा प्रश्न सोडवणार आहे. पाण्याचा विषय, रस्त्याचे विषय मार्गी लावू, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसायची आहे

लोकहिताच्या योजना कोणतेही सरकार आले तरी बंद करता कामा नये, मात्र महाविकास आघाडीने दुर्दैवाने ते केले होते. महायुती सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरू केल्या. मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसायची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe