पन्हाळगड : चार दरवाजाच्या भिंती झाल्या अखेर खुल्या

Published on -

४ जानेवारी २०२५ पन्हाळा : रामचंद्र काशीद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाच्या उत्खननाचे काम प्रगतिपथावर आहे. या दरम्यान चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमानींचे अवशेष उजेडात येऊ लागले आहेत.संपूर्ण उत्खननानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व समजणार आहे.

‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ या सदराखाली जागतिक वारसा यादीत सामावेशासाठी ‘युनेस्को’ कडे केंद्र शासनाने नामांकित केलेल्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांच्या प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने नुकतीच पन्हाळगडाला भेट होती.आता गडाची तटबंदी आणि वास्तूंसह गडावरील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतींची पाहणी करून संवर्धनाचे काम चालू झाले आहे.

पन्हाळगडाचा मुख्य दरवाजा म्हणजे चार दरवाजा होय. पूर्वेकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या चार दरवाजा शेजारी भले मोठे बुरुज, तर गडावर प्रवेश करण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना असलेले चार दरवाजे होते.या चार दरवाजातून सहजीसहजी कोणाला गडावर प्रवेश करता येत नसे.हा चार दरवाजा ब्रिटिश सरकारने पाडून तेथून गडावर जाण्यासाठी रस्ता केला.सध्या तोच मार्ग अस्तित्वात आहे.

कालांतराने त्या ठिकाणी नगरपरिषदेने प्रवासी कर नाका इमारत बांधली.त्या इमारतीखाली चार दरवाजा हा ऐतिहासिक ठेवा लुप्त झाला होता.आता ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ या सदराखाली जागतिक वारसा यादीत सामावेशासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू केले.प्रवासी कर नाक्याची इमारत पाडून उत्खननाचे काम सुरू केले.यामध्ये मूळ चार दरवाजाचे स्वरूप दृष्टिक्षेपात येऊ लागले असून, ऐतिहासिक जुना खजिना लोकांच्या नजरेस पडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News