Beed News : पंकजा मुंडेंच्या कारखान्यासाठी महिला सरपंचांकडून १२ लाखांची मदत मदत !

Beed News : स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक संकटात सापडला असल्याने महाराष्ट्रातील तमाम मुंडे समर्थक आक्रमक झाले असून त्याचे ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत.

जीएसटी विभागाने केलेली जप्तीची कारवाई ही राजकीय आकस बुद्धीने केली असून संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांना राजकीयदृष्ट्या जास्तीत जास्त कसे अडचणीत आणता येईल याचा विचार करून केली असल्याचे सर्व मुंडे समर्थकांचे मत झाले असून त्याचे उत्तर मतदानातून देवू.

तसेच हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मंडे समर्थकांनी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बचाव मोहीम हाती घेत मदतीचा ओघ सुरू केला आहे.

यामध्ये पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. मनोरमा दिलीपराव खेडकर यांनी १२ लाख १२ हजार १२ रुपयांची रक्कम दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचे घोषित केले आहे.

डॉ.खेडकर म्हणाल्या की, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी फार कष्टाने उभा केलेला हा कारखाना शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी चालू राहिला पाहिजे याचा विचार करून तसेच लोकनेते मुंडे यांनी समाजासाठी केलेल्या कार्यातून काही प्रमाणात का होईना ऊतराई होण्यासाठी ही मदत केली असल्याचे त्या म्हणाल्या.

स्व. मुंडे यांचे परळीबरोबरच पाथर्डी वर विशेष प्रेम होते. त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या राजकारणात संघर्ष करत असताना गोपीनाथ मुंडे यांचा आत्मा असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडला असून त्याला त्यातून बाहेर काढले नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

म्हणून पाथर्डी तालुक्यातील तमाम जनतेने राजकारण बाजूला ठेवून या कारखान्यास भरीव आर्थिक मदत करावी, असे आवाहन परिवर्तन प्रतिष्ठानचे सचिव तथा पाथर्डी भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe