मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग ६ महिन्यांसाठी बंद

Karuna Gaikwad
Published:

१० फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट मार्ग मंगळवार, ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे.त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई वाहतूक विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा येथे डावीकडे वळण घेऊन एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पनेवल एक्झिट येथून तळोजा, कल्याण-शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल-सायन महामार्गावरून पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एनएच ४८ महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे कळंबोली जंक्शनच्या सुधारणा करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. – तिरुपती काकडे,पोलीस उपआयुक्त,नवी मुंबई वाहतूक विभाग.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe