मुंबई : दक्षिण मुंबईतील भूमिगत पार्किंगवर उपाययोजना म्हणून बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग सुरू केले जाणार आहे. हे पार्किंग हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ असणार आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालय आणि लगतच्या परिसराजवळील पार्किंग समस्या कमी होणार आहे.
हुतात्मा चौक आणि न्यायालयाच्या परिरात पार्किंगची समस्या वाढली आहे. या परिसरात पार्किंगची समस्या ओळखून पालिकेने बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचे ठरवले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी करून कामाला सुरुवात केली आहे. पालिकेच्या आराखड्यानुसार, या स्वयंचलित सुविधेमध्ये १९४ कारची क्षमता असेल, म्हणजे जी सध्याच्या क्षमतेच्या चौपट असेल, त्यामुळे या परिसरातील पार्किंगची समस्या

दूर होईल, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली. काळा घोडा आणि रिगल सिनेमाजवळील अशा आणखी दोन ठिकाणी भूमिगत पार्किंग सुविधांची मागणी माजी नगरसेवक नार्वेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. दोन्ही भागात दिवसा पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच या भागाचे सौंदर्याकरण आणि अनुषंगिक कामे सुरू आहेत. त्यामुळे, या ठिकाणी भूमिगत पार्किंगसाठी काम सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अशी आहे पार्किंग सुविधा
महापालिका आराखड्यानुसार हुतात्मा चौकातील सुविधेमध्ये चार भूमिगत स्तर असतील आणि ते ७० कोटी रुपये खर्चुन बांधले जात आहे. सध्याच्या जागेवर पश्चिमेकडील बाजूस १२ मीटर प्रवेश रस्ता आणि पूर्वेकडील बाजूस ७ मीटर प्रवेश रस्ता आहे. वाहने पूर्वेकडील बाजूने प्रवेश करतील आणि पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडतील. जमिनीवरील भाग होल्डिंग एरिया म्हणून काम करेल. लिफ्टद्वारे कार पार्किंगमध्ये प्रवेश करतील.