Maharashtra News : शासनाने विविध शासकीय विभागांत मेगा भरती चालू केली असून, या मेगा भरतीबाबत मराठा समाजाला शंका आहे. राज्य सरकार मराठा समाजातील तरुणांना न्याय देणार आहे की नाही ? आरक्षणावर भूमिका घेणार आहेत की नाही, असा प्रश्न स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी प्रसिध्दीपत्रकात उपस्थित केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, शासन सेवेत ५ ते ७ टक्के मराठा समाज उरला असताना खुल्या वर्गातील ३८ टक्के जागांवर आरक्षित वर्गातील उमेदवार भरले जात असल्याने आरक्षण ५२ टक्क्यांवरून ९० टक्केपर्यंत गेले आहे, अशा परिस्थितीत राज्यकर्ते आणि तथाकथित संघटनेचे स्वयंघोषित नेते हे समाजाला न्याय मिळवून देतील का ?

यांनी समाजाला न्याय मिळवून द्यावा. आरक्षण लढयात काम करणाऱ्या काही लोकांनी स्वतःची घरे भरली असून, यांनी मराठा चळवळ बदनाम केली आहे. चांगल्या लोकांनी आता समाजासाठी पुढे येऊन सध्या सुरू असलेल्या नोकरभरतीवर स्थगित आणावी तसेच समांतर आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करून आरक्षणाप्रमाणेच नोकरभरती करावी.
यासाठी मराठा समाजाने आवाज उठवायला हवा. जर ही नोकर भरती झाली तर मराठा समाज कायमस्वरुपी शासकीय सेवेतून हद्दपार होईल. याबाबत कोणताही प्रतिनिधी बोलायला तयार नाहीत, असे मत डांभे यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिध्दी पत्रकावर स्वाभिमानी मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मनिषाताई निमसे, जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. राधा गमे मॅडम, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत दादा कराळे, रमेश शेळके, कार्याध्यक्ष निलेश काजळे, अनिल सुपेकर, सुदाम थोरे, शरद खांदे, सुधीर नागवडे, बाबासाहेब कराळे, निलेश दरेकर यांच्या सह्या आहेत.













