कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता पूर्ण जोमात सुरु असून पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (13 एप्रिल) मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली. कोकणातून 4 ते 8 डझनाच्या तब्बल 6,000 ते 6,500 पेट्यांची नोंद झाली.
या आंब्यांना गुणवत्तेनुसार प्रति पेटी 1,500 ते 4,500 रुपये इतका दर मिळत आहे. किरकोळ बाजारात हापूस 400 ते 800 रुपये डझनाने विकला जात आहे, त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार हापूस अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहे.

उत्पादनात घट, पण आता आवक वाढतेय
यंदा कोकणात हवामानातील बदलामुळे हापूसच्या उत्पादनात सुमारे 40 टक्के घट झाली आहे. नेहमीपेक्षा हंगाम उशिरा सुरू झाला असून सुरुवातीला आंब्याची आवक मर्यादित होती. मात्र, आता अचानक आवक वाढल्याने बाजारात आंब्याचा पुरवठा वाढला आहे
आणि परिणामी दरात 25 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्यात 3,000 ते 4,000 पेट्यांची आवक होती, तर आता ती दुपटीने वाढली आहे. त्यामुळे आंबा खरेदी करण्यासाठी सध्या अतिशय योग्य वेळ आहे.
हंगाम लवकर संपण्याची शक्यता
हापूसचे व्यापारी युवराज काची यांनी यंदाचा हंगाम 30 जूनपर्यंत न चालता 15 दिवस आधीच म्हणजे जूनच्या मध्यातच संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यामुळे जास्त काळ प्रतीक्षा केल्यास ग्राहकांना दर्जेदार आंबा मिळण्यात अडचण येऊ शकते. हापूस खरेदीची संधी मर्यादित असल्याने लोकांनी लवकर खरेदी करून हंगामाचा आनंद घ्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
कर्नाटक हापूसचीही बाजारात एंट्री
कोकणासोबतच कर्नाटकातूनही हापूसची आवक सुरू झाली आहे. रविवारी कर्नाटकातून 2 डझनाच्या सुमारे 10,000 पेट्या दाखल झाल्या. लाकडी पेट्यांची मात्र 40 ते 50 इतकी मर्यादित आवक झाली आहे.
सध्या कर्नाटक हापूसच्या कच्च्या मालाला 1,200 ते 1,800 रुपये प्रति पेटी असा दर मिळतो आहे. पायरी आंबा प्रति किलो 120 ते 150 रुपयांना विकला जात आहे. 20 एप्रिलनंतर कर्नाटक हापूसची आवक अधिक वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
ग्राहकांसाठी खरेदीस योग्य वेळ
सध्या आंब्याच्या दरात घट झाली असून बाजारात भरपूर आवक असल्यामुळे ग्राहकांसाठी ही खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे.
कोकण आणि कर्नाटक दोन्हीकडून आंब्यांची आवक सुरू असल्यामुळे दर्जेदार आंबा अधिक सहज उपलब्ध आहे. हंगाम मर्यादित असल्याने लवकरात लवकर खरेदी केल्यास दर्जा, चव आणि किंमतीचा योग्य ताळमेळ साधता येईल.