Pune Metro : पुणेकरांची वाहतूक समस्या कमी होणार ! मेट्रो मार्गावर दोन नवीन स्थानकांची भर

Tejas B Shelar
Published:

Pune Metro News : पुण्यातील स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी धनकवडी आणि बालाजीनगर येथे दोन नवीन मेट्रो स्थानक प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, बालाजीनगर स्थानकासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मंजुरी मिळाली असून, यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

मेट्रो प्रकल्पाच्या कामांवर आढावा
माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर कार्यालयात झालेल्या बैठकीत मेट्रो प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, खडकवासला-खराडी मेट्रो मार्ग आणि एस.एन.डी.टी ते माणिकबाग जोडमार्ग या प्रकल्पांचे प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे आहेत. त्याच वेळी, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्गांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य कॅबिनेटकडे पाठवण्यात आले आहेत. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणेकरांना जलद आणि सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल.

रोडमॅपची आखणी करण्याचं काम
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी धनकवडी आणि बालाजीनगर यांसारख्या नव्या मेट्रो स्थानकांची आवश्यकता असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. तसेच, शहरातील बस आणि रिक्षा स्टँड्सची संख्या आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन एका रोडमॅपची आखणी करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात एक हजार बस
बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम) योजनेबद्दलही भाष्य केलं. “पुण्यातील बीआरटीएस योजनेला अपेक्षित यश मिळालं नाही. रस्त्यावरील वाहतुकीची समस्या आणि बसची अपुरी संख्या यामुळे ही योजना अयशस्वी ठरली,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच 1,000 नवीन बस समाविष्ट केल्या जातील, याचीही त्यांनी घोषणा केली.

नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा नकाशा
मिसाळ यांनी पुण्यातील सर्व बस थांबे, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, आणि रिक्षा स्टँड यांचा एकत्रित नकाशा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नकाशे शहराच्या प्रमुख ठिकाणी लावले जातील, ज्यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या सोयीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावरील अतिरिक्त स्थानक, मेट्रो प्रकल्पांचा विस्तार, आणि पीएमपीएमएल बस ताफ्यात वाढ हे सर्व उपक्रम पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी उचललेली महत्त्वाची पावलं आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe