Maharashtra News : पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी मंगळवारी (दि. १) अटक केली. तपासासाठी तिन्ही आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
प्रवीण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. संभाजीनगर, लोणी काळभोर), विशाल धनाजी धायगुडे (वय ३१) आणि बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघे रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) ही आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-90.jpg)
या टोळीत आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास जारी केला आहे. मडीखांबे याच्याविरुद्ध यास्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मुंबईहून सातारा, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या ऑइल डेपोंना भूमिगत वाहिनीतून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. आळंदी म्हातोबाची परिसरातील डोंगरात २५ जुलै २०२३ ला मध्यरात्री भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस झाले होते.
या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तपासात हाती आलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी इंधन माफिया प्रवीण मडीखांबे आणि साथीदारांना अटक केली.