Pune Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येतेय. खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. मंडळी सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला. सध्या स्थितीला देशातील 55 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महत्त्वाची बाब अशी की यातील आठ गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. अशातच येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे.
नागपूर ते सिकंदराबाद आणि पुणे ते हुबळी या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता होती. मात्र यातील पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस चे ट्रायल रन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीचा उद्घाटन सोहळा 15 सप्टेंबरला होणार नाही हे स्पष्ट होत आहे. पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसचं ट्रायल रन 16 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.
तथापि ही गाडी कधीपर्यंत ट्रॅक वर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशातच आता पुणेकरांना दोन नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या दोन मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे ते हुबळी दरम्यान तीन दिवस आणि पुणे ते कोल्हापूर दरम्यान तीन दिवस वंदे भारत ट्रेन चालवली जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. दरम्यान, आता आपण या दोन्ही गाड्यांचे संभाव्य वेळापत्रक आणि या गाड्या कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोल्हापूर येथून सकाळी सव्वा आठ वाजता सोडली जाणार आहे आणि पुण्यात दीड वाजता पोहोचणार आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सोडली जाणार आहे आणि कोल्हापूर येथे सात वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसचे थांबे
मीडिया रिपोर्ट नुसार, या वंदे भारत ट्रेनला या मार्गावरील सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला जाणार आहे.
पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक
ही गाडी पहाटे पाच वाजता हुबळी रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि दुपारी दीड वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच पुणे रेल्वे स्टेशन वरून ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता रवाना होणार आहे आणि हुबळी येथे रात्री पावणे अकरा वाजता पोहोचणार आहे.
पुणे-हुबळी चे थांबे
मिळालेल्या माहितीनुसार, या गाडीला सातारा सांगली मिरज बेळगाव आणि धारवाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.