Raju shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता साखर कारखानादारांनंतर शिक्षण सम्राटांकडे मोर्चा वळवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील खासगी शिक्षण संस्था राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे.
फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाच रान केल. पण आताच्या खासगी शिक्षण संस्थांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थांना फीच्या माध्यमातून लुबाडले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच आता यासाठी आपल्याला रस्त्यावरील लढाई करण्याची गरज असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या पाठीशी असल्याची ग्वाही शेट्टी यांनी दिली. यामुळे आता राजू शेट्टी यासाठी आंदोलने देखील करण्याची शक्यता आहेत.
ते म्हणाले, चळवळीत काम करताना शेतकरी हित पाहिलं, पण शेतकऱ्यांच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा आर्थिक बुर्दंड बसत आहे.
ही लूट हाणून पाडण्यासाठी विद्यार्थी संघटनेने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सध्या राज्यसेवा आणि लोकसेवेच्या परीक्षांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पार पडली.
या विद्यार्थी परिषदेत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या. यामध्ये राज्य विद्यार्थी कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षण सम्राटांना इशारा दिला आहे.