१२ मार्च २०२५ मुंबई : महायुती सरकारची लोकप्रिय योजना ‘आनंदाचा शिधा योजना’ आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती. शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला राज्यातील एक कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता; पण आता राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आनंदाचा शिधासह अन्य कल्याणकारी योजना गुंडाळण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सरकार कोणतीही योजना बंद करणार नसल्याचे सांगत असताना अनेक योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी केलेल्या नाहीत.’आनंदाचा शिधा योजने’ च्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना सणासुदीच्या काळात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणा डाळ, एक लीटर पामतेल दिले जात होतं. गरिबांचा सण गोड करण्याच्या उद्देशाने शिंदे सरकारने ही योजना सुरू करण्यात आली होती; पण आता फडणवीस सरकारने ही योजना बंद केली आहे. नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा योजने’ला बगल देण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा अशा सणांना रवा, साखर, चणा डाळ, तेल अवघ्या सध्या १०० रुपयांमध्ये दिलं जायचे. ‘आनंदाचा शिधा योजना’ बंद होण्यामागचे निश्चित कारण समोर समोर आलेले नाही; पण या योजनेला लाडकी बहीण योजनेचा फटका बसला असल्याची चर्चा आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना कात्री लागलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.
सरकारने या योजनेसाठी यंदा केलेली तरतूद गेल्या आर्थिक वर्षातील तरतुदीपेक्षा कमी आहे. योजनेच्या अटी, शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे
‘शिंदे सरकारच्या काळात आणलेल्या योजनांचे नाव अर्थसंकल्पात दिसत नसल्याने त्या अप्रत्यक्षपणे बंद झाल्या आहेत. शिंदेंच्या काळातील योजना असल्यानेच ते बंद करायच्या असा निर्णय अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून घेतला असेल. – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष