Mumbai Pune ExpressWay : लोणावळा परिसरात सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आडोशी गावाच्या हद्दीत दरड कोसळली. यामुळे पुणे- मुंबई मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचा यावेळी खोळंबा झाला होता.
रात्री उशीरापर्यंत वाहतूक ठप्प होती. हा मातीचा ढीग जेसीबी, डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र महामार्गावरील मलबा काढण्यासाठी मंगळवार, २५ जुलै रोजी दुपारी १२ ते २ असा ब्लॉक घेतला जाणार आहे.
राज्यात ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर मुंबई-पुणे हायवेवर देखील दरड कोसळल्याच्या घटना घडली. आडोशी गावचे हद्दीत किलो मिटर ४१/१०० जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून रस्त्यावर आली होती.
लोणावळा मध्ये मागील २ दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहे. सोमवारी मध्य रात्रीपासून मुंबई-पुणे महामार्गावर मंदगतीने वाहतूक होत होती. रात्री आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानंतर मलबा हटविण्यात आला. त्यानंतर पहाटे अंशतः वाहतूक पूर्ववत करण्यात आली.