Maharashtra News : नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून जायकवाडीसाठी ५ हजार ६९६, तर गंगापूरसह कडवा व मुकणे धरणातून ५ हजार ३४० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक ते जायकवाडी हे १८८ किलोमीटरचे अंतर पार करत हे पाणी सोमवारी सकाळी जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गोदावरी नदीत शुक्रवारी (दि. २४) १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर हा विसर्ग वाढवण्यात आला.
रविवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता हा विसर्ग ६४२ क्यूसेक, दुपारी ११ वाजता १०९२, तर दुपारी २ नंतर ५६९६ क्यूसेक वेगाने करण्यात आला. गंगापूर धरणातून रविवारी सकाळी ६ वाजता ५०६ क्यूसेक वेगाने सुरू करण्यात आलेला विसर्ग सायंकाळी ५ वाजता २६१६ क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला होता, तर कडवा धरणातून १६२४ व मुकणेमधून ११०० क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
जायकवाडीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. दारणा धरणातून सोडलेले पाणी ५० किलोमीटरचे अंतर कापून नांदूरमधमेश्वर प्रकल्पात पोहोचण्यास १७ ते २० तास लागले.
नांदूरमधमेश्वर ते जायकवाडी अंतर १३८ किमी असून, पाणी पोहोचण्यास एकूण ७० तास वेळ लागणार आहे. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री सोडलेले पाणी सोमवारी सकाळी जायकवाडीत पोहोचणे अपेक्षित आहे, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) सांगितले.
गंगापूर धरणाच्या विसर्गाचा मार्ग वेगळा असून, हे पाणी नांदूरमधमेश्वरपर्यंत एक दिवसात पोहोचते. परंतु गंगापूर धरणातून रविवारी सोडलेले पाणी सध्या नदीचा प्रवाह सुरळीत नसल्यामुळे धिम्या गतीने पोहोचत आहे. पाणी अधिक प्रमाणात सोडल्यास पाण्याचा वेग वाढू शकतो.
या मार्गातील कोल्हापूर बंधाऱ्यांचे दरवाजे काढण्यात येत आहेत. शिवाय, नदीपात्रात पाणी जिरण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा अपव्यय अधिक होणार आहे. त्यामुळे साडेआठ टीएमसी पाण्यापैकी पाच ते साडेपाच टीएमसी पाणीच धरणात पोहोचण्याची शक्यता आहे.
जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी पाणी सोडणार
पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानुसार, मुळा धरणातून २.१० टीएमसी, प्रवरा प्रकल्पातून ३.३६ टीएमसी, गंगापूर धरणातून ०.५, गोदावरी दारणा प्रकल्पातून २.६४३ असे एकूण ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात येणार आहे.