अहिल्यानगर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आवष्यक उपाय योजनांवर व्यापक चर्चा करत गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त खा. नीलेश लंके यांच्यासह महाराष्ट्रातील खा. वर्षा गायकवाड, खा.भास्कर भगरे, खा. प्रतिभा धानोरकर, खा. नरेश म्हस्के, खा. बळवंत वानखेडे आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिवनेरीपासून सुरू करण्यात आलेल्या गडकोट आणि दुर्गसंवर्धन अभियानासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांसमवेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी गडकोट संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला.
महाराष्ट्राच्या गडकोटांवर छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराचा जसा गगनभेदी जयघोष होतो,तसाच दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही जय भवानी, जय शिवाजीचा निनाद झाल्याचे सांगत यावेळी खा. लंके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे ध्येय, पराक्रमी प्रशासन आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची दुरदृष्टी ही आजही मार्गदर्शक असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.