महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितले ! दूध भेसळ व वाळूतस्करी…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : दूध भेसळ व वाळू तस्करी ही समाजाला लागलेली कीड आहे, याचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. वाळू माफिया नेस्तनाबूत करण्याचा संकल्प केल्यानेच शासनाने वाळू धोरण सुरू केले आहे.

हे धोरण आम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील टाकळीमिया विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले होते.

याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अॅड. सुभाष पाटील, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे, सहाय्यक निबंधक दीपक पराये, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी गोरक्षनाथ मंडलिक आदी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, की जुन्या जाणत्या लोकांनी सहकार उभा केला, त्यांच्या कामाचा गौरव होणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून हा गौरव केला गेला पाहिजे, केंद्राने सहकार मंत्रालय उभे करून सहकाराला समृद्ध करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सरकार आणखी समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या काळामध्ये सहकार चळवळीमध्ये मोठे परिवर्तन घडवून येणार आहे. त्यातून सहकारी संस्था सक्षम होणार आहेत. या परिवर्तनासाठी सहकारी संस्थांनी सज्ज राहणे गरजेचे आहे.

यावेळी कर्डिले म्हणाले, जुन्या जाणत्या लोकांनी सहकार वाढवण्याचे काम केले. त्यातूनच शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवल्या, त्यामुळेच टाकळीमिया सोसायटी १०० वर्षांत उत्तम काम करू शकली.

या संस्था नसत्या तर शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकली नसती, दुधाचे अनुदान खासगी दूध संकलन संघाला मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहीत्र उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe