Maharashtra News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी करता ‘इंडिया’ आघाडी तील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सोडवला जाणार, हा मोठा प्रश्न आहे.
यासंदर्भात राज्याचा अभ्यास, विविध समीकरणे तपासली जातील व जिथे ज्यांची ताकद जास्त तिथे त्या पक्षाला उमेदवारी आदी बाबींवरून ‘सीट शेअरिंग फॉर्म्युला’ ठरणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आ. रोहित पवार बुधवारी नागपुरात पत्रपरिषदेत म्हणाले.
यासंदर्भात आ. रोहित पवार म्हणाले, मराठवाड्यात काही ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त आहे, मात्र तिथे आम्ही लढत होतो, विदर्भात कुठे आमची ताकद आहे; पण काँग्रेस लढत आहे.
कुठे कुणाची ताकद जास्त आहे, याचा सर्व्हे केला जाणार आहे. मतदारसंघाचा अभ्यास करून ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील. ज्या ठिकाणी तीन ते चार वेळा एखाद्या पक्षाचा उमेदवार पराभूत होत आला असेल, तिथे मित्र पक्षाला जागा देता येईल का, हेदेखील बघावे लागेल.
ज्या ठिकाणी सध्या लोकसभा किंवा विधानसभेची जागा ज्यांच्याकडे आहे ती जागा त्यांनाच मिळेल असेही नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया’ आघाडीत सुसंवाद असल्याने ‘संबंधित सीट आम्ही देणारच नाही किंवा सोडणारच नाही’ अशी परिस्थिती यंदा येणार नसल्याचा विश्वासही आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.
जे पक्ष संविधानाच्या बाजूने मात्र भाजपच्या विरोधात होते, त्याचा फायदा निवडणुकीत भाजपलाच झाला होता. यासंदर्भातही त्या पक्षांनी विचार करावा, यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचाही समावेश असू शकतो, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ‘एनडीए’च्या विरोधात असलेल्या पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीसोबत यावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.