Maharashtra news : राज्यसभेतील सहाव्या जागेवर निवडणूक अपक्ष म्हणून रिंगणात उतरू पाहणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा पेच आता सुटत असल्याचे सांगण्यात येत.
त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश न करता शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्याचे व ते शिवसेनेलाही मान्य असल्याचे सांगण्यात येत.
पक्षात प्रवेश केल्याशिवाय पाठिंबा देता येणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. तर प्रवेश करण्यास संभाजीराजे यांनी नकार दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार, हे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते.
याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, याच फॉर्म्युलावर शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात समझोता झाल्याची माहिती समोर येत आहे. याची घोषणा शिवसेनेकडून होते की संभाजीराजे यांच्याकडून होते, ते पहावे लागेल. आधीच घोषित केल्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही हा निर्णय मान्य करावा लागणार आहे.
राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना संभाजीराजे भाजपच्या कोट्यातून गेले होते. आता राज्यसभेवर निवडून जाताना ते शिवसेना पुरस्कृत असणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा त्यांनी शिवसेनेलाच पसंती दिल्याचे किंवा तशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळते.