Maharashtra Politics : इतरांच्या पाठींब्यावर राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याच्या तयारीत असलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची शिवसेनेने चांगलीच कोंडी केली आहे. काल संभाजीराजे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात बैठक झाली.
मात्र, त्यामध्ये पाठिंबा देण्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत.आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विषयावर बोलताना संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय त्यांना पाठिंबा दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

छत्रपतींबद्दल आम्हाला आदर आहे, ते निवडून यावेत असे वाटते. मात्र, त्यांनी शिवसेनेत यायला हवे. ते शिवसेनेत आले नाहीत, तर त्यांना पाठिंबा देता येणार नाही. उलट सहाव्या जागेसाठी शिवसेना दुसरा उमेदवार देणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनेने उमेदवार दिला तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास अनुकूलता दर्शविली होती.
मात्र, मागील टप्प्यात शिवसेनेने त्यांच्या वाट्याची जागा राष्ट्रवादीला दिली होती. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, ते राष्ट्रवादीला नैतिकता म्हणून पाळावा लागेल, असे चित्र आहे.
त्यामुळे शिवसेनेने ठरविले तरच आघाडीची मते संभाजीराजे यांना मिळू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. या विषयावर भाजपने अद्याप काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीकडून नाही जमले तर भाजप आपला उमेदवार बाजूला ठेवून संभाजीराजेंना मदत करणार का? याकडे लक्ष लागले आहे.