मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावरून मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा दौरा निश्चित असल्याचे सांगितले आहे.
आदित्य ठाकरे हे १० जून ला अयोध्येला जाणार असून त्या संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत. हा राजकीय दौरा नाही. ही आमची श्रद्धा आहे.
अयोध्येत शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. जो कोणी नकली भावाने अयोध्येत जात असेल, राजकीय हेतूने अयोध्येत जात असेल, कोणाला कमी लेखण्यासाठी जात असेल तर प्रभू श्रीराम पावणार नाही. त्याला विरोध होतो, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान, या सरकारने कौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केले होते. फडणवीस यांच्या या आरोपावरही यावेळी संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
ते म्हणाले, आता कौर्याची व्याख्या बदलावी लागेल. देशातील गेल्या ७ वर्षातील आणि महाराष्ट्रातील ५ वर्षाच्या अनेक घटनांचा अभ्यास केला तर कौर्य समजून घ्यावे लागेल, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.