Sarkari Yojana:- महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून, “पिंक ई-रिक्षा” योजनेद्वारे राज्यातील दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केला आहे. या योजनेचा उद्देश केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नाही, तर महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगता यावे, यासाठी ही योजना राबवली जात आहे.
कसे आहे या योजनेचे स्वरुप?
या योजनेची सुरुवात नागपूर येथून २० एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाली. नागपुरात पहिल्या टप्प्यात २,००० गरजू महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात आल्या.

योजनेचा पुढील टप्पा पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. एकूण ८ जिल्ह्यांतील १०,००० महिलांना ही रिक्षा मिळणार आहे.
लाभार्थी महिलांना किती रक्कम भरावी लागेल?
या पिंक ई-रिक्षा योजनेत सरकारकडून आर्थिक मदतीचा विशेष विचार करण्यात आला आहे. रिक्षेच्या एकूण किंमतीपैकी २० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. लाभार्थी महिलांना केवळ १० टक्के रक्कम भरावी लागेल, तर उर्वरित ७० टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून बँकांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रकारे महिलांना अत्यल्प खर्चात स्वतःचं वाहन आणि रोजगार मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, ही योजना “लाडकी बहीण” योजनेच्या धर्तीवर आहे. ज्या पद्धतीने “लाडकी बहीण” योजनेतून महिलांना आर्थिक मदत देऊन शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी आधार देण्यात येतो आहे, त्याचप्रमाणे “पिंक ई-रिक्षा” योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. यामुळे महिलांना केवळ रोजगार मिळणार नाही, तर शहरांमध्ये सुरक्षित वाहतूकचं माध्यमही तयार होणार आहे.
“महिलांनी महिलांसाठी” ही या रिक्षांची संकल्पना असून, महिलांनी चालवलेली ही ई-रिक्षा इतर महिलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा हा उद्देश यात आहे. मात्र, पुरुष प्रवाशांनी या रिक्षांचा वापर करू नये असा याचा अर्थ नाही. ही रिक्षा सर्वांसाठी असेल, परंतु महिलांच्या हातात वाहन देऊन त्यांना एक नवीन दिशा देण्याचा या योजनेचा हेतू आहे.
हे वाहन चालवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यासाठी विशेष ड्रायव्हिंग क्लासेस, वाहन देखभाल व सेवासुविधांची माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ वाहन देऊन थांबणार नाही, तर महिलांना पूर्णतः तयार करून त्यांना यशस्वी उद्योजक बनवण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे.
या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल, सामाजिक स्तर उंचावेल आणि त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिकदृष्ट्या आधार मिळेल. अशा प्रकारे राज्य सरकारच्या या पाऊलामुळे हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक सशक्त होईल. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.