Saudi Arabia Bans Visas | सौदी अरेबियाने हज यात्रा सुरू होण्यापूर्वी एक धक्कादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत, पाकिस्तानसह 14 देशांमधील नागरिकांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ व्यवसाय व कुटुंब व्हिसापुरती मर्यादित नसून उमराह व्हिसावरही लागू होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम जगतात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
या बंदीचा उद्देश अनधिकृत हज यात्रेकरूंना रोखणे हा असून, गेल्या वर्षीच्या हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत. त्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी बहुतांशजण नोंदणीविना आलेले यात्रेकरू होते. त्यामुळे यावर्षी सौदी सरकारने ठोस भूमिका घेत नोंदणी नसलेल्या प्रवाशांना प्रतिबंधित करण्यासाठी या देशांवर व्हिसा बंदी लागू केली आहे.

बंदी कधीपासून लागणार?
ही बंदी 13 एप्रिलनंतर लागू होणार असून, त्यानंतर उमराह व्हिसाचे निर्गमण थांबवले जाईल. हज यात्रा जूनमध्ये पूर्ण होईपर्यंत म्हणजे काही आठवड्यांसाठीच ही बंदी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर व्हिसा प्रक्रिया पूर्ववत सुरू होईल.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाचे समर्थन करत सांगितले की, हज यात्रेदरम्यान प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा सरकारचा प्रमुख हेतू आहे. यामुळे संपूर्ण यात्रेचा अनुभव अधिक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजित पद्धतीने पार पडू शकेल.
‘या’ 14 देशांवर व्हिसा बंदी-
ही व्हिसा बंदी ज्या 14 देशांवर लागू केली आहे त्यामध्ये भारत , पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त , इंडोनेशिया, नायजेरिया, इराक, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन आणि सीरिया यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे विशेषतः भारत आणि पाकिस्तानमधील हज व उमराहसाठी तयारी करणाऱ्या हजारो भाविकांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे संबंधित देशांच्या सरकारांनीही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.