शाळेतील विनयभंग प्रकरण : पर्यवेक्षक निलंबित, चौकशीच्या फेऱ्यात इतर शिक्षक !

Published on -

पारनेर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात आली असून, त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेने शिक्षण संस्थेतील वातावरण आणि विद्यार्थी-पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

शिक्षण संस्थेने तातडीने निर्णय घेत, आरोपी पर्यवेक्षकास सेवेतून निलंबित करून त्याचे मुख्यालय अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूल असे निश्चित केले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन आदेशानुसार, या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात येणार असून, संस्थेतील अन्य संशयित शिक्षकांवरही लक्ष ठेवले जात आहे.

या विद्यालयातील इतर तीन ते चार शिक्षकही चौकशीच्या भोवऱ्यात आले आहेत. ग्रामस्थांनी या शिक्षकांच्या मोबाईल कॉल्सच्या तपासणीची मागणी केली आहे. शिक्षण संस्थेच्या विशेष समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करून अहवाल सादर केला असून, त्यानुसार पर्यवेक्षक साहेबराव जऱ्हाड यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पर्यवेक्षक साहेबराव गोपाळा जन्हाड याला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. १९ मार्चपर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर २० मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. या संपूर्ण घटनेची माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.

या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि प्रत्येक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेत महिला सुरक्षा समिती स्थापन करावी, अशी मागणी महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे-ठुबे यांनी केली आहे. विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe