सातबारा उतारा, आठ-अ, आणि फेरफार उतारा लोकांनी डाउनलोड केला आणि सरकारने कमवले १२५ कोटी !

Ahilyanagarlive24 office
Updated:

Maharashtra News : सातबारा उतारा, आठ-अ, मिळकत पत्रिका आणि फेरफार उतारा, अशी डिजिटल कागदपत्रे नागरिकांनी डाऊनलोड केल्याने या माध्यमातून राज्य शासनाला तब्बल १२५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

आतापर्यंत राज्यभरातून ४.८९ कोटींपेक्षा जास्त सातबारा उतारे, १.४९ कोटी खाते उतारे, १० लाख मिळकत पत्रिका आणि १५ लाख ऑनलाइन फेरफार डाऊनलोड केले आहेत.

आतापर्यंत ‘महाभूमी’ संकेतस्थळावरून चार कोटी ८९ लाख ५७९ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले आहेत. आठ-अ म्हणजेच खाते उतारा एक कोटी ४९ लाख ६५ हजार १९ नागरिकांनी डाऊनलोड केला आहे.

मिळकत पत्रिका १० लाख २९ हजार ४९९, तर ऑनलाइन फेरफार १५ लाख २८ हजार ७३३ नागरिकांनी डाऊनलोड केले आहेत. चालू वर्षी १५ जुलै रोजी एका दिवसात महाभूमी संकेतस्थळावरून दोन लाख ५१ हजारांपेक्षा जास्त डिजिटल अभिलेख डाऊनलोड करण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

कोणालाही कुठूनही आपल्या जमिनीचा सातबारा केवळ जिल्हा- तालुका – गाव आणि स्वतःचे नाव लिहून पाहता येतो. तसेच डाऊनलोड करता येतो. ही सुविधा https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही मध्यस्थाविना नागरिकांना हे डिजिटल अभिलेख उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती ई-फेरफार कक्षाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी दिली.

दरम्यान, हा डिजिटल अभिलेख प्रकल्प जसा लोकोपयोगी आहे, तसाच डिजिटायझेशनच्या कामकाजासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणारादेखील आहे. सन २०१९ पासून आतापर्यंत सुमारे १२५ कोटी रुपये रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे.

त्यामध्ये सातबारा उतारे डाऊनलोड करण्यातून ७३.३५ कोटी, खाते उताऱ्यातून २२.४५ कोटी, मिळकत पत्रिकेतून २७.३३ कोटी आणि फेरफार उताऱ्यांमधून २.२९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

याशिवाय महाभूमी संकेतस्थळावर जमाबंदी आयुक्त निरंजनकुमार सुधांशू यांच्या पुढाकारातून ‘फेरफार संबंधी सद्यस्थिती’ पाहण्याची सुविधा आणि कोणत्याही गावात चालू सर्व ‘फेरफाराबद्दल माहिती देणारा डिजिटल नोटीस फलक’ या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe