Maharashtra News : राज्यातील इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता किंवा इतर जातीचा त्यामध्ये समावेश न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ५६ टक्के करा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे.
रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, तामिळनाडूमधील आरक्षण ७४ टक्क्यांपर्यंत गेले होते.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-शरद-पवारां.jpg)
त्याविरोधात काहीजण न्यायालयात गेले होते, परंतु ते न्यायालयात टिकले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी टोकाचे आंदोलन न करता मार्ग काढला पाहिजे. आरक्षणात १६ टक्के वाढ करून मराठा आरक्षण कायमचे निकालात काढून गरीब माणसाला जगण्याचा अधिकार मिळवून द्या, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.
एखाद्या समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू नये, असे काही जणांना वाटत आहे. त्यांना असे का वाटते, हे सुद्धा पाहिले पाहिजे.
कारण मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबईतून फोन गेले होते. पण केलेल्या कारवाईबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा दिली. यामागे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याची अनेकांना शंका आहे, अशा शब्दांत पवार यांनी सरकारवर टीका केली.