पुणे, नाशिक, शिर्डी मार्गावरील शेअर टॅक्सी प्रवास महागला

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या झालेल्या बैठकीत या तीन मागाँवरील काळ्या-पिवळ्या बिगर वातानुकूलित टॅक्सी आणि निळ्या-चंदेरी वातानुकूलित टॅक्सींच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली होती.

त्यानुसार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई ते नाशिक, शिर्डी आणि पुणे या मार्गावरील शेअर टॅक्सी सेवांसाठी ५० ते २०० रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे.

वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी, मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाशिकसाठी १०० रुपये आणि शिर्डीसाठी २०० रुपये अधिक मोजावे लागतील. त्याच प्रमाणे पुण्याला वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी ५० रुपये जादा द्यावे लागतील, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अहवालानुसार, टॅक्सी भाड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या खट्आ पॅनेलच्या शिफारशींच्या आधारे, तसेच या मार्गावर चालणाऱ्या टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींच्या मागण्यांवर आधारित भाडे सुधारणा स्वीकारण्यात आली.

भाडेवाढीची अंमलबजावणी करण्याची तारीख जाहीर केली नसली, तरी परिवहन विभागातील सूत्रांनी पुढील महिन्यापासून ते लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दादर, मुंबई येथील टॅक्सी थांब्यांवर सुधारित दर जाहीर करण्यास सांगितले आहे.

मुंबई-पुणे टॅक्सी मार्ग १५५ किमी, तर मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी अनुक्रमे १७५ किमी आणि २६५ किमी लांबीचा आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने मुंबई-पुणे मार्गावरील टॅक्सी भाड्यात तीन वर्षपिक्षा कमी कालावधीत फेररचना केली आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये टॅक्सी भाडे मंजूर केले होते; परंतु परिवहन प्राधिकरणाने मुंबई-नाशिक आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील टॅक्सी भाड्यात सप्टेंबर २०१३ पासून सुधारणा केलेली नाही.

परिवहन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टॅक्सी चालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई टॅक्सी असोसिएशन, ही प्रमुख टॅक्सी संघटना डिसेंबर २०२१ पासून मुंबई-नाशिक मार्गावरील टॅक्सी भाडे सुधारण्याची मागणी करत आहे; परंतु परिवहन प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केली नाही.

मात्र ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबई-पुणे मार्गावरील भाडे सुधारण्याच्या मागणीला मान्यता देण्यात आली. रेल्वे आणि एसटी बसेस व्यतिरिक्त बरेच प्रवासी पुणे, नाशिक आणि शिर्डी येथे प्रवास करण्यासाठी शेअर टॅक्सीचा पर्याय निवडतात. खासगी बस आणि टॅक्सींमुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार टॅक्सी चालक करत आहेत.

असे असेल शेअरचे नवीन भाडे

मुंबई-नाशिक वातानुकूलित टॅक्सी: ५७५ रुपये (सध्या ४७५ रुपये) मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सी ८२५ रुपये (सध्या ६२५ रुपये) मुंबई-पुणे बिगर वातानुकूलित टॅक्सी: ५०० रुपये (सध्या ४५० रुपये) मुंबई-पुणे वातानुकूलित टॅक्सी ५७५ रुपये (सध्या ५२५ रुपये)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe