स्वारगेट बस स्थानकातील प्रकरणात धक्कादायक खुलासा ! आरोपीच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश

Published on -

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस चौकशीतून आता नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपीने चौकशीत कबुली दिली की त्याला पीडित तरुणीवर बलात्कार करायचाच नव्हता, पण त्याचा एक वेगळाच हेतू होता.

नराधम आरोपीचा अत्याचाराचा डाव

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्रभर स्वारगेट बस स्थानकावर फिरायचा आणि एकट्या महिलांना टार्गेट करायचा. तो गोड बोलून महिलांचा विश्वास जिंकायचा आणि मग त्यांच्या सोबत गैरवर्तन करायचा. घटनेच्या रात्रीही त्याने एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. पण ती तरुणी वेळीच सावध झाली आणि तिथून निघून गेली.तिच्या जागी दुसरी सावज हाती लागली आणि त्या तरुणीवर त्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

२६ फेब्रुवारीच्या पहाटे ताई म्हणत संवाद…

२६ फेब्रुवारीच्या पहाटे ५ वाजता, पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. तिला साताऱ्याच्या फलटण शहरात जायचं होतं. तिने नेहमीप्रमाणे फलटणच्या बससाठी प्लॅटफॉर्मवरील बाकावर वाट पाहत बसली. तेव्हाच आरोपी तिच्या जवळ आला आणि तिला गोड बोलून ‘ताई’ म्हणत संवाद साधला. त्याने विश्वास संपादन करत तिला चुकीची माहिती दिली की, फलटणला जाणारी बस इथं लागत नाही, ती दुसऱ्या ठिकाणी उभी आहे. यावर सुरुवातीला पीडितेला संशय आला. पण आरोपीने तिचा विश्वास संपादन केला आणि मी तुला तिथे सोडतो, असं सांगून तो तिला दुसऱ्या बाजूला घेऊन गेला.

बसमध्ये दोन वेळा लैंगिक अत्याचार

आरोपी तिला एका शिवशाही बसजवळ घेऊन गेला आणि सांगितलं की गाडीची लाईट बंद आहे, प्रवासी झोपले आहेत. तिने आत जाण्यास नकार दिला. पण त्याने तिला मोबाईल टॉर्च लावून आत जाण्यास सांगितले.पीडित तरुणीने आत जाताच आरोपी तिच्या मागोमाग गेला आणि तिथेच तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केला.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणीही महिलांना सुरक्षितता नाही, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. महिलांसाठी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe