सरकारी यंत्रणा, पैशांशिवाय एकतरी निष्ठावंत शिवसैनिक फोडून दाखवा ; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

Mahesh Waghmare
Published:

मुंबई : शिवसेना (ठाकरे) फोडण्यासाठी काहीजण सक्रिय झाले आहेत; परंतु हिंमत आणि मर्दाची अवलाद असाल तर ईडी, सीबीआय, सरकारी तपास यंत्रणा आणि पैशांशिवाय एकतरी निष्ठावंत शिवसैनिक फोडून दाखवा,असे थेट आव्हान शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना दिलेल्या ओवाळणीवरून भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला.अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडक्या बहिणींची मतेसुद्धा परत देणार का,असा खरमरीत सवाल करत टीकास्त्र सोडले.

कडवट निष्ठावंत शिवसैनिकांनो, अशा शब्दांत ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच, ‘उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सभागृह दणाणून सोडला.ठाकरेंच्या हस्ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवबंधन कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

खासदार संजय राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, सुभाष देसाई, सूरज चव्हाण आदी नेते यावेळी उपस्थित होते.दरम्यान, दानवे यांनी जगप्रसिद्ध लेणीची प्रतिकृती ठाकरे यांना भेट देऊन सन्मान केला.शिवसेना (ठाकरे) पक्ष फुटणार, नऊ खासदार पक्ष सोडणार, असे तथ्यहीन वृत्त प्रसारित झाले.परंतु, कितीही फोडाफोडी करा, निष्ठावंतांच्या तटबंधीला जराही तडा गेलेला नाही.

दानवे यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील शिवबंधनाचा दाखला देत, ज्यांच्या मनगटावर शिवबंधन आहे, तो कडवट शिवसैनिक शिवसेनेची साथ कधीच सोडत नाही. लढण्यासाठी तलवार लागते. तलवार पेलण्यासाठी मनगट लागते. नाही तर हातात तलवार आहे. मात्र, चालवण्याची हिंमत होत नाही. ती कोठे चालवायची हेच त्यांना कळत नाही. ज्यांनी गद्दारी केली, त्यांची मने मेली आहे.

त्यामुळे त्यांची तलवार कोणावर चालवत आहेत, हेच त्यांना कळेनासे झाले आहे, असा टोला लगावला. देशाच्या मुळावर कोण येत असेल तर देशहितासाठी आम्ही उभे आहोतच,आमच्या सोबत येतील, त्यांचेही स्वागत आहे.आम्ही आधी देशद्रोह्यांना गाडू, सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा खून करणाऱ्यांपासून आम्ही देशाला वाचवणार आहोत, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

लाडक्या बहिणींची मते परत देणार का ?

विधानसभा निवडणुकीपूर्वी तिन्ही भावांनी लाडक्या बहिणींना दीड हजारांची ओवाळणी दिली. निवडणुका झाल्यानंतर आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांची फसवणूक केली. आता कुठे गेले ते लाडके भाऊ. त्यावेळी भाऊगर्दी केली होती; परंतु सत्तेत आल्यानंतर बहिणींना विसरले, त्या बहिणींची मते परत देणार का, असा सवाल करत लाडक्या बहिणींनी भावांना जाब विचारावा, असे आवाहन केले.

पुढील २३ वर्षे महापालिका कर्ज भरत बसणार का ?

सन २०१२ मध्ये सुनील प्रभू महापौर होते. त्यावेळी मुंबई महापालिकेची मुदतठेव नव्हती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने मुंबईचा विकास करत मुदतठेव ९० हजार कोटींवर नेली. मात्र, गेल्या अडीच वर्षांत हीच मुदतठेव ८० हजार कोटींवर आली आहे. मुदतठेव मोडीत, पालिका रुग्णालयाचे खासगीकरण, उद्या पालिका ही बड्या विकासकाला देतील.

देशात सर्वाधिक ३७ टक्के कर मुंबई महापालिकेतून केंद्र सरकारच्या तिजोरीत जातो.मात्र, आजही मुंबई महापालिकेवर दोन लाख ३० हजार कोटींचे कर्ज आहे.मुदतठेव अशीच मोडीत काढत राहिले, तर पुढील २३ वर्षे मुंबई महापालिकेला कर्ज फेडत बसावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यत केली.

महाराष्ट्रात लढण्याची ताकद फक्त शिवसेनेत – संजय राऊत

शिवसेनेतून काही लोक ईडी सीबीआयला घाबरून गेली तर काही लोक पैशांच्या आमिषाला बळी पडून गेलेत. अंबादास दानवे यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मनगट आहे, ही शिवसेनेची ओळख आहे. काही लोकांना भाड्याने मनगट घ्यावी लागतात. अंबादास दानवे यांनी भाषण केले नाही.कारण त्याचं काम बोलत. आताचे राज्यकर्ते नकली बापाचे आहेत. शिवसेना फोडण्याचे अघोरी प्रकार केला आहे. परंतु महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. महाराष्ट्रात लढण्याची ताकद फक्त शिवसेनेत आहे, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe